भाषांतराच्या क्षेत्रात पाऊल ठेवणे ही माझ्या आयुष्याला
वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवणारी एक नितांतसुंदर घटना आहे. यामुळे मी स्वतःला शोधू
शकले, माझी सकारात्मकता
वाढली आणि सर्वात मुख्य म्हणजे माझे मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करण्यास अतिशय
उत्तम संधी मिळाली. माझ्यासाठी हा व्यवसाय म्हणजे केवळ जगण्याचे साधन नसून तो माझा
छंद आहे. मराठी माध्यमातून शिकल्यामुळे मला शालेय शिक्षणाचा आनंद पुरेपूर अनुभवता
आला असे माझे स्पष्ट मत आहे. वाचनाची आवड असल्याने लहानपणापासून मराठी, इंग्रजी आणि हिंदी
भाषांमधील अनेक पुस्तके तसेच सदरे वाचून झाली होती. त्यामुळे या तिन्ही भाषांवर
माझी बऱ्यापैकी पकड आहे. पण मातृभाषा असल्यामुळे किंवा माझ्या पाहण्यात आलेली
सर्वात समृद्ध भाषा असल्यामुळे माझे मराठी भाषेवर माझे विशेष प्रेम आहे आणि तो
माझ्या जगण्याचा एक अनिवार्य भाग आहे. मला उपजतच एक गोष्ट कायम खटकत आली आहे, ती म्हणजे
अशुद्धलेखन आणि व्याकरणिक चुका.
माझ्या वाचनात जे जे अशुद्ध लिखाण येईल ते व्याकरणाच्या
दृष्टीने नीट आहे की नाही याचे निरीक्षण करणे आणि ते तसे नसेल तर माझ्या वतीने
त्यात सुधारणा करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करण्याची सवय मला सर्वकाही कळायच्या
वयातच लागली असावी. कोणत्याही भाषेत वाचन करताना व्याकरणाच्या चुका आढळल्या तर मला
ते नेहमीच सलते. या पार्श्वभूमीवर जेव्हा मला भाषांतरकार म्हणून काम करण्याची संधी
मिळाली, तेव्हा मी नेहमीच
तिचे सोने करण्याचा प्रयत्न केला आहे. भाषांतर करणे म्हणजे फक्त भाषेचा बदल नसून, ती एक कला आहे आणि
ही कला शिकण्यासाठी इतर बरीच कौशल्ये आत्मसात असणे आवश्यक आहे. त्यातील पहिले कौशल्य म्हणजे वाचन, दुसरे कौशल्य म्हणजे
शुद्ध उच्चारण आणि तिसरे सर्वात मुख्य कौशल्य म्हणजे स्त्रोत व लक्ष्य भाषेचा
संपूर्ण अभ्यास (मुख्यत्वे व्याकरण). ही तिन्ही कौशल्ये आत्मसात केल्याशिवाय तुम्ही
उत्तम भाषांतरकार बनू शकत नाही.
भाषांतर करताना, मी स्त्रोत भाषेतील मजकुराच्या गाभ्यापर्यंत जाण्याचा
प्रयत्न करते. मूळ लेखकाला काय अभिप्रेत आहे हे समजून घेण्यासाठी त्याच्या बाजूने
विचार करावा लागतो. त्याच्या भावनांना समजून घ्यावे लागते. ही सर्व प्रक्रिया
माझ्यासारख्या पुस्तकी किड्याचे विचार आणि ज्ञान दोन्ही समृद्ध करून जाते. अतिशय
खोल अभ्यास केल्यावरच आपण दुसऱ्या भाषेतील मजकुराचे मर्म समजून घेऊन त्याला आपल्या
भाषेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या शब्दांत मांडू शकतो. हे सारे करताना मला
फार आनंद होतो. नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळते. भाषांतर क्षेत्रात कार्यरत
असल्यामुळे नाविन्य आणि नवनिर्मिती आपसूकच घडून जाते व काहीतरी सुंदर निर्मिती केल्याचा आनंद आपल्याला मिळतो.
No comments:
Post a Comment